Thursday 7 June 2012



नमस्कार मित्रहो,


कायदा, अध्यात्म आणि जीवनविकास हे हेडिंग वाचलं कि अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. विशेष असे कारण कि अश्या विषयावरती  ब्लॉग  कोणी लिहिला आहे याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले असेल. एक कायदेतज्ञ ज्याने कायद्याची जाडीजुडी  पुस्तकं आणि त्यातील रुक्ष विषय याचा सखोल अभ्यास केला आहे त्याच्याकडून अध्यात्म आणि जीवनविकास वगैरे ' ओलावा' असणाऱ्या विषयावर काही लिखाण केले जावे हे नक्कीच संशयास्पद आहे असे अनेकांचे मत असेल आणि याच मताला छेद देण्याचा हा माझा छोटासा प्रयास ...




खर तर अनेकांच्या या मताशी मी तसा सहमत आहे आणि तसा सहमत नाही देखील. कारण मुळात भारतीय समाजात फार पूर्वीपासून असा चुकीचा समज करण्यात आला आहे कि परमेश्वर, देव, भक्ती हा भेकड आणि भित्र्या लोकांचा प्रांत आहे. भारतीयांच्या मनावर हे जाणून बुजून कोरलं गेलं आहे.




आता प्रश्न असा कि आम्हाला मानवी कायदा म्हणजे काय हे माहित आहे. कारण प्रत्येक देशाचा, समाजाचा आपला असा एक कायदा असतो आणि त्या नागरिकांना किवा त्या समाजातील लोकांना तो समानपणे बंधनकारक असतो. जसे भारतात लागू होणारे भारतीय दंड विधान १८६०, हिंदू विवाह कायदा, मोटार कायदा. ज्याप्रमाणे ' कायद्याचे अज्ञान' हा बचाव असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही माना अथवा मानू नका, तुम्ही ज्या देशात राहता, ज्या प्रदेशात, समाजात राहता तेथील कायदा तुम्हाला लागूच असतो आणि तुमच्या हातून तो कळत अथवा नकळत मोडला गेला तरी त्याचीहि शिक्षाच असते. मनुष्याच्या भाषेत याला ' शिक्षा' असे संबोधले जाते. हेच तत्व परमेश्वरी कायद्यातहि लागू असतेच कि तुम्ही परमेश्वराला माना किवा मानू नका त्याचा प्रत्येक कायदा हा मानणारा आणि न मानणारा या दोघांनाही समानपणे लागू असतो.




मग आम्हाला प्रश्न पडतो कि आम्ही जे कोणी आहोत, ज्याने कोणी आम्हाला निर्माण केलं, हे विश्व ज्याने निर्माण केलं त्याचे कायदेही असणारच, त्याचे नियमही असणारच. मग ते आम्हाला कसं कळणार कसं हे नक्की काय? हा प्रकार नक्की काय असतो? याविषयी आम्हाला कसं कळणार? कुठून कळणार? आणि कोण सांगणार? आणि जे कोणी सांगेल त्यावर आम्ही विश्वास ठेवायचा कसा आणि का? यावर अतिशय सोपं उत्तर प्रत्येक धर्माच्या धर्म ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. मग ती पवित्र गीता असो, कुराण असो, बायबल असो किवा अजून काही. हिंदू धर्मात ज्याला अनादी अनंत काळापासून मान्यता आहे आहे आणि ज्यानुसारच धर्माची स्थापना आणि प्रगती होत गेली तो आधार म्हणजे  'वेद'. वेदांमध्ये परमेश्वराचा कायदा कसा कार्यरत असतो आणि त्याचे मानवाला अपेक्षित फळ आणि शिक्षा यांची सांगड अतिशय उत्तम प्रकारे घातली गेल्याचे ऐकवीत  आहे. तसेच गीतेमध्ये भगवान कृष्णाने अर्जुनास जो जीवनोपदेश सांगितला त्यातही परमेश्वरी कायद्याचे नियम पालन करून जीवन विकास कसा घडवणे आवश्यक आहे याचे सखोल विवरण केलेले आढळून येते... यालाच अध्यात्मात ' कर्माचा अटळ सिद्धांत' असे संबोधले जाते.




कर्माचा अटळ सिद्धांत म्हणजे काय? तर परमेश्वरी आणि मानवी कायदा पालन केल्याचे किवा तोडल्याचे फळ मिळणे म्हणजे कर्माचा अटळ सिद्धांत. आता माझ्या मित्रांना वाटेल कि कर्माचा अटळ सिद्धांत आणि फळ याचा काय संबंध? तर हेच रहस्य मला उलगडण्याचा प्रयास मला येथे करायचा आहे. येथे मला माझ्या एका वकील मित्राने सांगितलेली सत्य कथा सांगावीशी वाटते.




फार वर्षापूर्वीची एक सत्य घटना आहे. अहमदाबादेत एक सत्र न्यायाधीश न्यायदानाच्या सेवेत होते. सकाळी नित्य कर्मानुसार ते नदीकिनारी फिरावयास गेले होते. तेथे त्यांनी एका माणसास दुसऱ्या माणसाचा खून करून  सुरा हातात घेऊन पळताना पहिले. परंतु त्यांनी ती गोष्ट कोणासच सांगितली नाही. कारण त्यांना ठाऊक होते कि तो खटला त्यांचेच न्यायालयात येणार आहे. त्यानुसार तो खटला त्यांचेच न्यायालयात आला. परंतु त्यांनी खून करून पळताना पाहिलेला मनुष्य आणि त्यांच्यासमोर उभा केलेला आरोपी हा वेगळाच आहे हे त्यांनी पहिले. त्यांनी खून ज्याने केला होता त्या व्यक्तीस नीट पहिले होते परंतु त्यांचेसमोर आरोपी म्हणून भलत्याच व्यक्तीला उभे केले गेले होते. सत्य माहित असूनहि त्या न्यायाधीशांना काही बोलणे शक्य नव्हते. सरकारतर्फे त्या आरोपीवर खटला भरला गेला, साक्षी पुरावे बळकट उभे केले आणि न्यायाधीश महोदयांना त्या आरोपीसच गुन्हेगार समजून शिक्षा सुनावणे भाग पडले. त्या न्यायाधीश महोदयांचा परमेश्वर आणि परमेश्वराचे अकारण कारुण्य यावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळेच त्यांनी त्या आरोपीस शिक्षा सुनावणीच्या आधी आपल्या खोलीत बोलावले आणि त्या आरोपीस सांगितले कि मला ठाऊक आहे तू खून केलेला नाहीस परंतु तुझ्याविरुद्ध इतका सबळ पुरावा उभा केला गेला आहे कि तुला मला फाशीची शिक्षा देण्यावाचून पर्याय नाही. तेव्हा आता मला तूच सत्य सांग की तुझ्या आयुष्यात तू काय केलं आहेस आजवर. तेव्हा तो आरोपी रडू लागला आणि म्हणू लागला कि साहेब मी हा खून केला नाही, खून झालेल्या व्यक्तीस मी आजवर पाहिलं देखील नाही, खुनाच्या दुसऱ्या दिवशी पोलीस घरी आले आणि मला मुसक्या बांधून घेऊन गेले, मी निर्दोष आहे साहेब. न्यायाधीश महोदय म्हटले कि हो मला ठाऊक आहे तू निर्दोष आहेस परंतु कायद्याच्या प्रक्रीयेपणे तूच दोषी आहेस तेव्हा तुझा भूतकाळ खरा खरा सांग. तेव्हा तो आरोपी म्हटला कि साहेब मी याआधी २ खून केले आहेत आणि त्या दोन्ही खुनांमध्ये मी पैसे आणि सत्तेच्या जोरावर पोलिसांच्या मदतीने स्वतः सुटून निर्दोष लोकांना अडकवले आहे. परंतु या खुनात माझा काहीच सहभाग नाही. न्यायाधीश महोदयांचा परमेश्वराचा  न्याय आणि त्याचा दयाळूपण यावरचा विश्वास अजूनच दृढ झाला आणि त्यांच्यासमोर ठेवलेल्या साक्षी पुरावांच्या आधारे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.


परमेश्वरी कायदा आणि मानवी कायदा हा एकच असतो असे माझे मत आहे. परंतु कायद्याचे पालन करणारा आणि न करणारा यांना त्यांच्या प्रकृतीनुसार शिक्षा मिळत असते. प्रकृतीनुसार याचा अर्थ कायद्याचे उल्लंघन का केले गेले, कसे केले गेले, पिडीत व्यक्तीस किती वेदना झाल्या, उल्लंघन होताना मन:स्थिती कशी होती आणि बरेच काही निकष वापरून मानवी कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा करण्यास वापरले जातात. परंतु परमेश्वरी कायदा हा पूर्णतः वेगळा असू शकतो. मानवी कायद्यात सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असतात. परंतु ईश्वराच्या न्यायालयात  शिक्षा करताना एक सर्वात मोठा फरक किंवा निकष हाच  असतो आणि तो म्हणजे गुन्हा करणारा आस्तिक आहे कि नास्तिक. आता प्रश्न पडतो या म्हणण्याला पुरावा काय? उत्तर अतिशय सोपं आहे, ते म्हणजे ज्याला मानायचं त्याने मानावं, ज्याला नाही मानायचं त्याने जरूर मानू नये. ईश्वराच्या कायद्यात सवलत हि मिळतेच. परंतु हि सवलत कोणाला मिळते? तर ज्याचा 'परमेश्वर आहे' या अतिशय प्राथमिक गोष्टीवर पूर्णतः विश्वास आहे त्यालाच. 

मानवी कायद्यात शिक्षेपासून पळण्यासाठी बऱ्याच पळवाटा असू शकतात. अनेक चुकीच्या मार्गांचा अवलंब करून शिक्षेपासून वाचता येतही असेल, परंतु जगातल्या सर्वश्रेष्ठ वकिलांची फौज जरी 'त्याच्या' न्यायालयात उभी केली तरी इथे केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेपासून मुक्ती मिळूच शकत नाही. आपल्याला बऱ्याचदा "मी कोणाचंही काहीही वाकडं केलेलं नाही, कोणालाही फसवलेल नाही मग तरीही परमेश्वर माझ्याशी असं का वागतो? तो का इतका निष्ठुर आहे? मी चांगलं वागतो आणि समोरचा इतकी वाईट पापं करूनदेखील इतका सुखात आहे आणि माझी हि अवस्था" असे वारंवार बोलून आपलं चित्त विचलीत करणारे लोक भेटतात. कुठेतरी आपल्याही मनात क्षणभर का होईना पण 'असं का ?' हि शंका डोकावते. तिथेच आपण स्वताला सावरायचं असतं. याबाबत एक छोटंसं उदाहरण आपल्याला कायम  आठवलं पाहिजे. ते असं कि समजा एक मोठं पिंप आहे. त्यात आपण आधी वाळू भरली, मग दगड भरले,मग गहू भरले,मग भुसा भरला आणि त्या पिंपाच्या तळाशी एक छोटंसं छिद्र पाडलं. तर आता मला सांगा, त्या पिंपातून बाहेर येणाऱ्या वस्तूंचा क्रम कसा असेल? आधी वाळू येईल, मग ती संपल्यावर दगड येतील, मग गहू येतील आणि मगच भुसा येईल ना? असं होऊ शकतं का की आधी गहू येतील मग दगड हवेत आणि वाळू, दगड भुसा जो मी भरून ठेवला आहे तो येउच नये? असं होऊ शकतं का? उत्तर सोपं आहे, ते म्हणजे नाही.

 ज्या क्रमाने जी गोष्ट, ज्या प्रमाणात भरली आहे त्याच प्रमाणात आपण तिचा उपभोग घेऊ शकतो. ते पिंप म्हणजे मनुष्याचं प्रारब्ध, त्यात दगड, भुसा भरणं किंवा गहू भरणं हे त्या मनुष्याचं कर्म आणि पिंपात भरलेली गोष्ट क्रमाने बाहेर येणं हा कर्माचा अटळ सिद्धांत. जेव्हा जेव्हा हि परमेश्वराला नावं ठेवणारी धूर्त माणसे, जाणूनबुजून आपल्यासमोर त्यांचं रडगाणं गातात किंवा पापं करणारी परंतु तरीही सुखात ऐशो आरामात राहणारी माणसे आपल्या नजरेत येतात तेव्हा आपल्याला ही खूप छोटीशी परंतु खूप मोठी गोष्ट आठवणं गरजेचं आहे. परमेश्वर हा संपूर्ण न्यायी आहे आणि त्याला 'म्यानेज' कोणीच करू शकत नाही हे विसरता कामा नये.

मला इथे एक गोष्ट अभिमानाने नमूद करावीशी वाटते कि, माझ्या इथे मांडलेल्या या सर्व विचारांमागे माझे सद्गरु डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात आमचे लाडके बापू यांची प्रेरणा आहे. अनिरुद्ध बापू यांचे शास्त्रशुद्ध, विज्ञाननिष्ठ आणि समतोल विचार हे माझे प्रेरणा स्थान आहेत. अनिरुद्ध बापू यांचा संपूर्णतः वैज्ञानिक दृष्टीकोन परंतु ' विज्ञानाच्या मर्यादेनंतर जे सुरु होतं ते अध्यात्म' हा ठाम दृढविश्वास मला जास्त भावतो. समाजात आज अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतीलही परंतु फक्त अनिरुद्ध बापू यांचेच विषयी आणि त्यांचे अगाध ज्ञान याविषयी मला प्रचंड असा आदर आणि विशेष कुतूहल आहे आणि मानवी कायद्याकडून परमेश्वरी कायद्याकडे जाण्याचा जो जीवनविकासाचा मार्ग आहे त्या मार्गावर एक मित्र म्हणून डॉ. अनिरुद्ध बापू यांची मला साथ हि शब्दातीत आहे.     

सर्वात शेवट माझ्या मित्रांना सांगावेसे वाटते, मित्रहो इथे केलेल्या पापांची जशी इथल्या न्यायलयात शिक्षा होते तशी इथे केलेल्या पुण्याचे इथल्या कुठल्याच न्यायालयात कौतुक अथवा बक्षीस दिले जात  नाही. परंतु ' तो ' संपूर्णतः न्यायी असल्यामुळे जशी आपल्या पापाची शिक्षा तो आपल्याला फार कमी प्रमाणात देतो, त्याच्या हजारो पटीने आपण केलेल्या चांगल्या कामाचे किंवा पुण्याचे तो कौतुक करतो आणि भरभरून बक्षीस देतो. हे ज्याला कळलं त्याने सर्व काही कमावलं आणि  हे ज्याला नाही कळलं त्याने सर्व काही गमावलं. कारण परमेश्वरची गणितं हि खूप वेगळी असतात. त्यात अधिक अधिक बेरीज न होता गुणाकार देखील करायची सोय त्या परमात्म्याने केलेली असते. 

आपण फक्त मनापासून इथले कायदे पाळायचे आणि त्याच्यावर सोडून द्यायचं. कारण ' तो ' जो आहे तो खूप वेगळा आहे आणि त्याची खेळी ही खूप वेगळी आहे. जीवनविकास, जीवनविकास म्हणजे नक्की काय? तो मी कसा करायचा? माझा उद्धार मी स्वतः कसा करायचा याच्यासाठी आपले जहाज नेहमीच भरकटत असते. तेव्हा डॉ. अनिरुद्ध बापूंच्या  सारखा एखादा महान दीपस्तंभ आपले जहाज अगदी अलगद किनाऱ्याला आणून सोडत असतो...गरज फक्त एकच असते, ती म्हणजे मला तो दीपस्तंभ पाहता आला पाहिजे आणि त्या दिपस्तम्भावर पूर्णतः  विश्वास ठेऊन माझं जहाज किनाऱ्याकडे नेता आलं पाहिजे.....